technology

अष्टपैलू आशाताई !!!


पार्श्वगायनाच्या या सुवर्णमयी वाटचालीत आशाताईंच्या प्रतिभेनेच त्यांच्यासमोरचे अडथळे दूर केले. कठीण परिस्थिती हळूहळू बदलत गेली आणि ती त्यांच्या अनुकूल होत गेली. या त्यांच्या अवस्थेशी संबंधित गाणीही आहेत. ही गाणी आजही तितकीच टवटवीत आहेत. त्यांची भावावस्था सांगणारी आहेत. आशा भोसलेंनी १९४७ मध्ये पार्श्वगायन हे व्यवसाय म्हणून स्वीकारले, त्यावेळी लता मंगेशकरांनी आपले पाय या क्षेत्रात घट्ट रोवले होते. त्यामुळेच आशाताईंना पाय रोवणे सोपे नव्हते. म्हणूनच आपले स्वरपंख विस्तारण्यापूर्वीच आशाताईंनी ठरवले होते, की दिदीची नक्कल करायची नाही. मग त्यांनी स्वतंत्र शैलीत गायन सुरू केले. हा सारा काळ संघर्षाचा होता. सुरवातीला त्यांना एक्स्ट्रा कलाकार, नर्तकी, सहनायिका यांना आपला आवाज द्यावा लागला. पण त्यातही त्यांनी वेगळेपण जपले. हळूहळू हा आवाज संगीताच्या क्षेत्रात स्थिरावला आणि नंतर तर त्याने रा्ज्य केले. हेलन यांना दिलेला आशास्वर नंतर वहिदा रहमान, नूतन, मीनाकुमारी या बड्या नायिकांचा आवाज बनला.
आशाताईंचा स्वर कॅबरे आणि मुजरे करणार्‍यांच्या तोंडातून काढून नायिकांच्या ओठी सजविण्याचे श्रेय जाते ठेक्यांचे बादशाह ओ. पी. नय्यर यांना. त्यांनीच आशाताईंमधील 'आशा' जागवली. शमशाद बेगम, गीता दत्त यांच्यानंतर 'आशा' हे त्यांचे नवे फाईंड होते. त्यांनी हा स्वर असा बहरवला की हा स्वर दंतकथा बनला आहे. मदनमोहन यांचे संगीत जसे लतामय आहे, तसेच ओपींचे संगीत आशामय आहे.
बर्मन पिता-पुत्रांचेही आशाताईंच्या गुणांना पैलू पाडण्यात मोठे योगदान आहे. 'पेईंग गेस्ट' नंतर एस.डी. बर्मन यांचे लतादिदींशी वाजले. त्यानंतर मग त्यांनी आशाला निवडले. बर्मनदादांकडे आशाताईंनी अवीट गोडीची गाणी गायली. त्याचवेळी बड्या नायिकांनाही त्यांचा स्वर मिळाला. शैलेंद्रची अर्थपूर्ण गीतेही आशाताईंनी अतिशय उत्कटतेने लोकांपर्यंत पोहोचवली. 'तिसरी मंझील'नंतर आशा व आर. डी. बर्मन ही जोडी जमली. या जोडीने तर धमाल केली.
महान संगीतकार शंकर-जयकिशन या जोडीतील शंकर यांच्याशीही लतादिदींचा वाद झाला. मग शंकर यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात गाणे दिदींनी बंद केले. म्हणूनच 'मेरा नाम जोकर' मध्ये लताचे एकही गाणे नाही. त्याचवेळी शंकर यांनी आशा यांचा आवाजाचा अतिशय योग्य वापर केला. सी. रामचंद्र (अण्णा) व लता यांची जोडी तुटल्यानंतर अण्णा संगीत क्षेत्रात फार काळ टिकू शकले नाहीत. पण 'आशा' व 'नवरंग' या चित्रपटात त्यांनी आशाताईंच्या आवाजाचा उपयोग केला. तो अतिशय प्रभावी ठरला.
त्याचवेळी रॉयल्टीच्या मुद्यावरून लता व रफी यांच्यातही काही मतभेद झाले. मग दोघांनी एकमेकांबरोबर गाणे बंद केले. सर्वच संगीतकार वैतागले. कारण लता-रफी हे युगल स्वर अजरामर समीकरण होतं. मग सगळ्या संगीतकारांनी रफी आणि आशा हे नवे समीकरण तयार केले. आशाताईंनी या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. आशाताईंच्या जीवनातील हा टर्निंग पॉईंट ठरला. विशेष म्हणजे रफीबरोबर सर्वाधिक गाणी आशाताईंनी गायली आहेत.
बड्या बॅनर्सपैकी बी. आर. फिल्म्सने आशाला संगीताच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी महत्त्वाची मदत केली. 'धूल का फूल' यामधून आशाची स्वरयात्रा प्रारंभ झाली. मग 'गुमराह', 'साधना', 'धर्मपुत्र', 'हमराज' व 'वक्त' या गाजलेल्या चित्रपटात आशाताईंचा स्वर आहे. बी. आर. चोपडांमुळे आशाताईंनी साहिर लुधियानवींसारख्या सिद्धहस्त कवींच्या रचना गाण्यास मिळाल्या. एन. दत्ता व रवी या संगीतकारांची गाणीही आशाताईंनी अजरामर केली.
Share on Google Plus

About admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment